Thursday, December 3, 2015

रुग्णालयातले नाटक (नौटंकी)

आटपाट नगरच्या राजाच्या रुग्णालयाच्या प्रमुखांनी सर्व प्रमुख वैद्यांची तातडीची सभा बोलाविली. बहुतेक वेळा सभेचा विषय सांगण्यात येत नसे, कारण सभेची पूर्वतयारी करणे आवश्यक असते असे प्रशासनातील कोणालाच वाटत नसावे. या सभेचाही विषय कोणास सांगण्यात आला नव्हता. तरीही हातातली कामे सोडून सर्व प्रमुख वैद्य सभेला हजर झाले. रुग्णालय प्रमुखांचा चेहरा गंभीर दिसत होता. कोणीअकस्मात वैकुंठवासी झाले की काय असे काही जणांच्या मनांत आले.
"आज मी आपणा सर्वांना सभेला बोलावले आहे, त्याचे कारण गंभीर आहे" रुग्णालय प्रमुख म्हणाले. सर्वांनी आपापले चेहरे जमतील तेव्हढे गंभीर केले. रुग्णालय प्रमुखांजवळ बसलेल्यांचे चेहरे आधीपासूनच गंभीर होते. "कोणा एका विक्रुत मनोव्रुत्तीच्या दुष्टाने आपल्याला माझ्याबद्दल एक घाणेरडे पत्र पाठविले आहे, त्याबद्दल मी ही सभा बोलाविली आहे."
चार पाच जण सोडून इतर सर्वांचे चेहरे गोंधळलेले झाले.
"मला पत्र मिळालेले नाही" असे बरेच जण म्हणाले.
"काही विशिष्ट वैद्यांनाच ते पत्र मिळाले आहे" असे एका माहितगाराने सांगितले. आता सर्वांचे चेहरे उत्सुक झाले. पत्रांत असे आहे तरी काय असे त्यांच्या चेहर्‍यांवर दिसत होते.
"माझ्यावर घाणेरडे आरोप केलेले आहेत" रुग्णालय प्रमुख म्हणाले. माझ्या नियुक्तीसाठी मी खोटी प्रमाणपत्रे दिली असे म्हटले आहे. माझी प्रमाणपत्रे खरी आहेत. मी ती कोणालाही दाखवायला तयार आहे."
कोणीही प्रमाणपत्रे बघण्यास मागितली नाहीत. सनसनाटी गोष्ट पुढे असणार याची सर्वांना कल्पना होती.
"आपल्या रुग्णालयांतील काही वरिष्ठ वैद्य स्य्रिया आणि मी यांच्यात घाणेरडे संबंध आहेत असेही पत्रांत म्हटले आहे" रुग्णालय प्रमुख म्हणाले. "इतक्या पवित्र शिक्षक आणि वैद्य भगिनींबद्दल असे म्हणणे इतके किळसवाणे आहे म्हणून सांगू."
काही चेहर्‍यांवर अनभिज्ञता दिसली, तर काही चेहर्‍यांवर बेरकी हास्य उमटले. ते जर रुग्णालय प्रमुखांना दिसले असले तर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
"ज्या माणसाने - माणूस कसला, सैतानच तो - हे हीन कृत्य केले आहे, तो कोण आहे ते मला ठाऊक आहे. त्याने असे कृत्य पूर्वीही केले आहे. पण ते जाऊ द्या. आता मी कंटाळलो आहे. नोकरी सोडू्न जावे असे मला आता वाटू लागले आहे. माझ्या पत्नीला ...."
सर्वांनी कान टवकारले. त्यांच्या पत्नीलाही हे पत्र पोहोचले की काय?
"माझ्या पत्नीला दुर्धर आजार झाला होता, तेव्हा माझ्या लक्षांत आले की मी माझ्या सर्वांत जवळच्या व्यक्तीला पुरेसा वेळ दिलेला नाही. आता नोकरी सोडून तिला माझा सर्व वेळ द्यावा असे मला वाटते आहे" असे म्हणून ते स्तब्ध झाले. त्यांच्या डोळ्यांतून घळघळा अश्रू वाहू लागले. ते पाहून उपस्थित स्तिमित झाले. पण एक प्रमुख वैद्य मात्र शांत होते.
"नाटक करतायत ते" असे ते शेजारी बसलेल्या राजवैद्यांना हळूच म्हणाले. "या आधी मी होतो त्या रुग्णालयांझी त्यांनी असेच रडून दाखविले होते. शाळा आणि महविद्यालयांत असतांना ते नाटकांत अप्रतिम काम करत असत आणि ग्लिसरीनशिवाय रडून दाखवत असत."
राजवैद्य सर्द झाले. आपल्याला हाच अनुभव काही काळाने एका कनिष्ठ वैद्याकडून येणार आहे असे त्यांना तेव्हा वाटायचे काही कारण नव्हते. पण ते आपण नंतर बघू.
(Key words: Drama in Hospital)

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क